Tuesday, 11 September 2018

वार्षिक रिटर्न तपशील व अडचणी

वर्ष २०१७-१८ चे वार्षिक रिटर्न दाखल करावयाचे फॉर्म उशिरा आले आहे.     त्यात सामान्य नोंदणीकृत करदात्यांसाठी जीएसटीआर- कम्पोझीशन करदात्यांसाठी जीएसटीआर-९ए असे फॉर्म्स निर्देशित करण्यात आलेले आहे.    सर्व करदात्यांसाठी वार्षिक रिटर्न दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१८ ही शेवटची तारीख असेल.
वार्षिक रिटर्नमध्ये पुढील तपशील द्यावा  लागेल.
1
आर्थिक वर्षात (जुलै २०१७ ते मार्च २०१८) घोषित केलेल्या आवक-जावक पुरवठ्याचा संपूर्ण तपशील.  
2
सदर आर्थिक वर्षात रिटर्न्समध्ये घोषित केलेला असा जावक पुरवठा ज्यावर कर देय आहे असा तपशील. 
3
पूर्वीच्या दाखल केलेल्या रिटर्न्समध्ये घोषित केलेल्या इनपुट टँक्स क्रेडिटचा तपशील.     
4
पूर्वीच्या दाखल केलेल्या रिटर्न्समध्ये घोषित केलेल्या रिव्हर्स इनपुट टँक्स क्रेडिट आणि अपात्र असलेल्या  इनपुट टँक्स क्रेडिटचा तपशील आणि आयटीसी संबधीची इतर माहिती.                
5
आर्थिक वर्षामध्ये रिटर्न्स द्वारे देय भरणा केलेल्या रकमेचा तपशील.
6
मागील आर्थिक वर्षातील असे व्यवहार जे त्या वर्षासाठी वार्षिक रिटर्न दाखल करण्याची देय तारीख किंवा सदर वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर महिन्याचे रिटर्न दाखल करणे यापैकी जे आधी असेल त्यात घोषित केले असेल तर त्याचा तपशील. म्हणजेच जुलै २०१७ ते मार्च २०१८ च्या व्यवहारातील तपशील एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ च्या रिटर्न्समध्ये माहिती दिली असल्यास हा तपशील फार महत्वाचा राहील व यांत अडचणी येवू शकतात.                                                                                  
7
इतर माहिती जशी की- परतावा, एचएसएन कोड नुसार आवक आणि जावक पुरवठ्याची माहिती, विलंब शुल्क आणि कम्पोझीशन करदात्यांकडून केलेला आवक पुरवठा अप्रूव्हल बेसिस वर पाठवलेल्या वस्तूंचा तपशील.

                                                                  
वार्षिक रिटर्न दाखल करतांना येणाऱ्या अडचणी                                           
1
सर्वात मोठी अडचण म्हणजे वार्षिक रिटर्न अजूनही करदात्यांसाठी अपलोड साठी उपलब्ध झालेले नाही. सध्या सप्टेंबर महिना चालू आहे. सर्व करदाते त्यांची लेखा पुस्तके पूर्ण करीत आहेत.  वार्षिक रिटर्न दाखल करण्यास जेवढा उशिर होईल तेवढ्या जास्त अडचणींना तोंड ध्यावे लागेल.  
2
वार्षिक रिटर्न मधील काही रक्कम जीएसटीएन द्वारे स्वयं निर्मित होणार आहे. परंतु या रकमा स्वयं निर्मित कशा होतील, कुठून होतील आणि जर रकमेत काही चूक झाली तर त्याचे काय करणार? याचे उत्तर अजून मिळालेले नाही.                                                   
3
करदात्यांला इनपुट टँक्स क्रेडिटचा तपशील सादर करतांना भांडवली इनपुट वस्तू आणि इनपुट सेवा अशी विभागणी करून नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत व्यावसायिकाकडून केलेल्या आवक पुरवठ्याचा स्वंतत्र तपशील दाखल करावा लागेल.   
4
त्याचप्रमाणे मागील आर्थिक वर्षातील असे व्यवहार ज्यांचा तपशील या वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात  दाखल केलेला आहे त्याचीही माहिती वार्षिक रिटर्न मध्ये ध्यावी लागेल. म्हणजेच करदात्यांने एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ महिन्याच्या रिटर्न्समध्ये मागील आर्थिक वर्षात ज्या काही सुधारणा केल्या त्याच्याही नोंदी करदात्यांला आता यापुढे ठेवाव्या लागतील.
5
कम्पोझीशन करदात्यांकडून केलेला आवक पुरवठा, नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत व्यावसायिकाकडून केलेला आवक पुरवठा यांची विभागणी करणे देखील करदात्यांला गरजेचे आहे.